६. होम स्वीट होम
आता वेळ होती ती घरी परतायची. फक्त ठरलेल्या प्रयोगांचेच निकाल घेऊन नव्हे, तर खूप मोठी आशादायी बातमी घेऊन.
प्रत्येक जण उड्डाणाच्या तयारीला लागला. खरेतर आधी ठरल्याप्रमाणे पृथ्वीकडून येणाऱ्या सूचनांनुसार उड्डाण करायचे होते. पण पृथ्वीशी संपर्क होत नसल्या कारणाने संगणकाच्या सूचनांनुसार उड्डाण करायचा निर्णय घेतला गेला. त्यानुसार प्राचीने ऑटो पायलट कंट्रोल सुरू केला.
पृथ्वीवरून उड्डाण करताना यानाला जितक्या ताकदीने वर झेप घ्यावी लागते त्यापेक्षा जवळपास निम्माच जोर मंगळावरून उड्डाण करण्यासाठी पुरेसा असतो. ह्याचे मुख्य कारण म्हणजे पृथ्वीवरून एखाद्या वस्तूला बाहेर पडण्यासाठी ११. २ किलोमीटर प्रति सेकंद इतका वेग आवश्यक असतो. ह्या वेगाला 'मुक्ती वेग' (एस्केप वेलॉसिटी) असे म्हणतात. मंगळाचा मुक्ती वेग ५. ०२७ किलोमीटर प्रति सेकंद इतका, म्हणजेच पृथ्वीच्या तुलनेत जवळपास निम्मा आहे.
यानाला उड्डाणाचा संकेत देण्यात आला. यानाच्या इंधनाने पेट घेतला. धुराचे प्रचंड मोठे लोट मागे सोडत यानाने उड्डाण केले. पृथ्वीवर पोहोचण्यासाठी ह्यापुढे पाच महिने वाट बघावी लागणार होती...
यानामधल्या एका उपकरणातून येणाऱ्या "बीप" मुळे के. रमेशला जाग आली. पृथ्वी केवळ एका आठवड्याच्या अंतरावर आली आहे, त्याची माहिती देणारा तो आवाज होता. उड्डाण केल्यापासून यानाने कापलेल्या अंतराला अनुसरून हे उपकरण सूचना देत होते. सर्वजण उत्साहाने तयारीला लागले. अजून साधारण दीडशे तास आणि आपण आपल्या घरी असू असे प्रत्येकाच्या मनात येत होते. वसुंधरेचे दर्शन घ्यायला सर्वांनी खिडकीच्या काचेला डोळा लावला.
पण एक आश्चर्य होतं. पृथ्वी कोणाच्याही नजरेस येत नव्हती. चंद्र अंतराळातल्या एका ठराविक जागेभोवती घिरट्या घालत होता. त्याचा फिरण्याचा वेग कमालीचा वाढलेला दिसला.
तो ज्या जागेभोवती फेऱ्या मारताना दिसत होता, त्याच जागेवर पृथ्वी असणे अपेक्षित होते. पण पृथ्वी तिथे दिसतच नव्हती !
हरिहरने तातडीने काही उपकरणे चालू केली. ही तीच उपकरणे होती, ज्यांच्या आधारे मंगळावरून पृथ्वीशी संपर्क करण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न करून झाले होते. त्यांनी ह्यापूर्वी दाखवलेल्या निरीक्षणात आणि आताच्या निरीक्षणात फारसा फरक नव्हता. उपकरणामध्ये नोंदल्या जाणाऱ्या क्ष किरण आणि गॅमा किरणांची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसत होती. ही किरणे ज्या दिशेहून मिळत होती ती दिशा होती चंद्राच्या कक्षेच्या केंद्रस्थानी!!
म्हणजेच पृथ्वीच्या जागी!!
सर्वजण कोड्यात पडले. काही वेळाने यानामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. हे असे कसे शक्य आहे? यानातील संगणकाने आपल्याला चुकीच्या दिशेने आणले का? असा प्रश्न मनात येऊ लागला.
बरोबर पाच महिन्यांचा प्रवास, आतापर्यंत कापलेले अंतर, सूर्याचा डोळ्यांना दिसणारा आकार, चंद्राचा दृश्य पृष्ठभाग, या सर्वांची तुलना करता, यान योग्य दिशेने चालले आहे ह्यात शंका नव्हती. मग हे कसे शक्य होते?
नचिकेतने परत एकदा टीव्ही आणि सेट टॉप बॉक्स चालू केला. उड्डाणाच्या पहिल्या दिवसापासून प्रत्येक बातमी सर्वांनी डोळ्यांखालून घालायला सुरू केली. परतीच्या प्रवासात टीव्हीवरील बातम्या परत परत बघणे आणि काही धागादोरा हाती लागतोय का त्याचा शोध घेणे असे अनेकदा करून झाले होते. तरी, ह्यापेक्षा अधिक चांगला पर्याय कोणासमोरच नव्हता.
१५ जुलै, २०३१ या पूर्ण दिवसभरात 'लार्ज हॅड्रॉन कोलायडर' संबधित बातम्या प्रसारित झाल्या होत्या. प्रयोग यशस्वीपणे सुरू झाल्यावर पृथ्वीवरील शास्त्रज्ञांचा आणि लोकांजल्लोष टीव्हीवर दाखवला जात होता. एका खास मुलाखतीमध्ये प्रयोगातील शास्त्रज्ञ सुधीर 'एल एच सी'संबधित माहिती सांगत होता. नचिकेतला हीच बातमी अतिशय महत्वाची वाटली.
मुलाखतीमधील सर्वात शेवटचा प्रश्न होता, "ह्या प्रयोगामध्ये काही गडबड झाली, तर मानवजातीवर त्याचे काही विपरीत परिणाम होतील का?"
ह्यावर सुधीरने, 'प्रयोग फसल्यास त्यातून ज्या पदार्थाची निर्मिती होईल, तो क्ष किरण आणि गॅमा किरण यांचा प्रचंड मोठा स्रोत असेल, आणि ह्यामुळे मानवाचे भवितव्य पूर्णपणे बदलून जाईल.' इतकेच सांगितले.
यानामधील सर्व जण खगोलशास्त्राचे अभ्यासक असल्याने सर्वांना सुधीरच्या बोलण्याचा अर्थ कळायला फार वेळ लागला नाही. पुढचे काही तास बातम्यांमध्ये शोध घेत 'लार्ज हॅड्रॉन कोलायर'वरील ह्या आगळ्यावेगळ्या प्रयोगाविषयी माहिती काढण्यात गेले. हरिहरने तातडीने आपल्या संगणकामध्ये काही ई-पुस्तके उघडली. उघडलेल्या सर्व पुस्तकांचा विषय एकच होता !
कृष्णविवर.
सर्वांनी ही पुस्तके खंगाळून काढली. सर्वांना हळूहळू नक्की काय परिस्थिती आहे हे लक्षात येऊ लागले. परंतु कोणाचेही मन वस्तुस्थिती मान्य करायला तयार होत नव्हते. हा प्रसंग खूप दुःखद आणि भावनिक होता. मानवाने घेतलेली गरुडभरारी म्हणजे अशा गोष्टीची तयारी होती जी मानवाला शून्यात घेऊन आली होती.
पृथ्वीचे रूपांतर एका सूक्ष्म कृष्णविवरात झाले होते आणि चंद्र त्याच्याभोवतीच घिरट्या घालत होता. त्याच्या फिरण्याच्या वाढलेल्या वेगाचे कारण सर्वांच्या लक्षात आले. कृष्णविवराची गुरुत्वीय शक्ती इतकी प्रचंड असते की त्यातून कोणतीही वस्तू, फक्त वस्तू नव्हे तर प्रकाश सुद्धा बाहेर पडू शकत नाही. त्यामुळे ते डोळ्यांना दिसणे अशक्य असते.
विसाव्या शतकाच्या अखेरीस स्टीफन हॉकिंग या शास्त्रज्ञाने असा दावा केला होता, की कृष्णविवर क्ष किरण आणि गॅमा किरण उत्सर्जित करत असते. हे उत्सर्जन कृष्णविवराच्या पृष्ठभागावरून नव्हे तर त्याच्या बाहेरच्या 'इव्हेंट होरायझन' ह्या काल्पनिक भागामधून होत असते. 'इव्हेंट होरायझोन' ही एक मर्यादा असते. त्याच्या आत एखादी वस्तू गेली तर ती कृष्णविवरामधून बाहेर पडणे अशक्य असते. जोपर्यंत ती वस्तू 'इव्हेंट होरायझन'च्या बाहेर असते, तोपर्यंतच तिची कृष्णविवराच्या कचाट्यातून बाहेर पडण्याची शक्यता असते.
आताच्या क्षणाला शोक करण्यापेक्षा यानाला नियंत्रणात ठेवणे आणि त्याला योग्य दिशेस वळवणे महत्त्वाचे होते. पृथ्वीपासून निर्माण झालेल्या कृष्णविवराचा आकार खूप छोटा होता. त्याच्या 'इव्हेंट होरायझन'चा आकारसुद्धा खूप लहान होता. त्यामुळे यानाला कृष्णविवरात जाण्यापासून रोखता येणे त्या क्षणाला शक्य होते.
प्राचीने तातडीने यानाचा ताबा घेतला. यानाला पृथ्वीच्या दिशेस जाण्यापासून रोखायला हवे हे तिला समजले. त्यानुसार तिने थ्रस्टर्स चालू करून यानाची दिशा बदलली.
पण काही फरक पडणार होता का? आपले घर, आपली पृथ्वीच आता राहिली नव्हती ! यानाला वळवून नेणार कुठे? यानातील अन्नसाठा अजून जेमतेम तीन ते चार महिने पुरणार होता. त्यानंतर काय खाणार? आणि दहा जणांच्या जगण्याचा हेतू काय?...
सर्वजण विचार करत असतानाच प्राचीने परत एकदा यानाची दिशा बदलली. काही तासांत यानाने कृष्णविवराभोवती एक स्लिंग शॉट पूर्ण केला आणि गती वाढवून घेतली.
यानातील रडारवर दिसत होता लाल-हिरवा, पुसटसा मंगळ !
समाप्त.
- भूषण करमरकर (bhushan.karmarkar12@gmail.com)