शनी दुर्बिणीतून बघितला की आपल्याला त्याची सुंदर कडी नजरेस पडतात. ही कडी बर्फाच्या लहान तुकड्यांपासून बनलेली आहेत, ज्यांचे आकार काही सेंटीमीटर ते काही मीटर मोठे आहेत.
ह्या कड्यांमध्ये आपण विस्तीर्ण आणि चमकदार A रिंग आणि B रिंग, आणि त्या दोन्हीमध्ये असणारी पोकळी (गॅप) एका लहान दुर्बिणीसह पाहू शकतो. या अंतराला "कॅसिनी विभाजन" (Cassini Division) असे म्हणतात. A रिंग आणि B रिंग वगळता इतर अनेक कडी शनीभोवती आहेत, पण ती बघण्यासाठी अद्ययावत दुर्बिण आणि कॅमेऱ्याची गरज लागते.
माझ्याकडे असणाऱ्या दुर्बिणीतून ह्या कड्यांचे मी निरीक्षण करत आलोय आणि फोटो सुध्दा काढले आहेत. त्यावरून जी माहिती आपल्याला समजते ती थोडक्यात बघूया.
सोबत जोडलेल्या फोटोमध्ये शनीच्या दोन प्रतिमा दाखवल्या आहेत. हे दोन्ही फोटो मी स्वत:, एकसमान उपकरणे वापरुन (दुर्बिण कॅमेरा इत्यादि) काढलेले आहेत.
वरील बाजूस असणारी प्रतिमा सप्टेंबर 2020 मध्ये तर खालची ऑगस्ट 2021 मध्ये काढली आहे (जवळपास एक वर्ष अंतराने).
ह्या एक वर्षात शनीच्या *आपल्याला दिसणाऱ्या प्रतिमेत* काय काय बदल झाला?
1) शनीची त्याच्या कड्यांवर पडणारी सावली
2) शनीच्या दक्षिण गोलार्धचा आपल्याला दिसणारा भाग
3) शनीच्या कड्यांचा दृश्य पृष्ठभाग
(आणि माझ्या फोटोग्राफीचे कौशल्यासुद्धा थोडेसे सुधारलेले वाटते ;) )
शनीच्या कक्षेचे (orbit)जे प्रतल (plane)आहे, त्या प्रतलाशी शनीची कडी सुमारे 27 अंश झुकलेली आहेत. (जशी पृथ्वी तिच्या कक्षेच्या प्रतलाशी 23.5 अंश कललेली आहे त्याचप्रमाणे).
शनीला सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी अंदाजे 30 वर्षे कालावधी लागतो. ह्या कालावधी मध्ये, कड्यांच्या आणि शनीच्या कक्षेमध्ये असलेल्या कोनामध्ये काहीही बदल होत नाही. तो 27 अंशच राहतो.
मग आपल्याला शनीच्या आणि त्याच्या कड्यांच्या अश्या वेगळ्या प्रतिमा का दिसतात?
दृश्य भागामध्ये असणारा हा फरक अवलंबून आहे खालील दोन गोष्टींवर:
1) शनीचे त्याच्या कक्षेतील स्थान
2) पृथ्वीचे तिच्या कक्षेतील स्थान
सोबत जोडलेली आकृति बघा.
*पृथ्वीवरून बघितले असता* शनीच्या कड्यांचा कल सुमारे 15 वर्षांच्या अंतराने वाढत जातो, आणि पुढील 15 वर्षात कमी होत जातो. (आपली 15 वर्ष म्हणजे शनीचे अर्धे वर्ष, ज्यात तो सूर्याभोवती अर्धी प्रदक्षिणा पूर्ण करतो).
हे समजण्यासाठी थोडीशी कल्पनाशक्ती गरजेची आहे. कारण तीस वर्ष फास्ट फॉरवर्ड करू शकत नाही :).
खरंतर असे काही प्रश्न पडले, की शाळेत भूगोलाच्या लॅब मध्ये ठेवलेला पृथ्वीचा ग्लोबच आठवतो. तो वापरुन असे प्रश्न किती सोप्या आणि सहज पद्धतीने समजावून सांगता येतात.
अजून एक सोपं उदाहरण देतो: एखाद्या फन पार्क किंवा जत्रेतील पाळण्यामध्ये टोरा टोरा किंवा ती फ्रॉक घातलेली मुलगी असते आणि आपण त्या फ्रॉकच्या घेरात असणाऱ्या खुर्च्यांवर बसायचे. त्या फ्रॉकचा घेर थोडा कललेला असतो. ती जशी गोल गोल फिरायला लागते, तशी बाहेरील व्यक्तीस तो फ्रॉकचा घेर खाली वर होत आहे असे दिसते.
(टीप: वरील माहिती मी नव्याने शोधलेली नाही, त्यावर आधीच संशोधन झालेले आहे. निरीक्षण करून पडताळा घेण्यात मला खूप मजा आली म्हणून हे लिखाण. आपल्यातील विद्यार्थ्यांना थोडे प्रोत्साहन मिळेल हा प्रामाणिक हेतु).
-धन्यवाद
भूषण करमरकर
www.instagram.com/amateur_astronomers_group/