अरे चंद्रा, मला तुझे सर्व रंग माहीत आहेत

चंद्राचा रंग कोणता?

निरीक्षण केल्यास तुम्हाला जाणवेल, की जेव्हा चंद्र उगवताना आणि मावळताना तो पिवळसर किंवा केशरी दिसतो, आणि जेव्हा तो आकाशात उंच असतो तेव्हा राखाडी पांढरा दिसतो.
हा फरक मुख्य करून वातावरणातील वायु आणि हवेचे प्रवाह यामुळे होतो. थोडक्यात काय, तर चंद्राचा प्रकाश वातावरणातून जितका जास्ती प्रवास करेल, तितका तो अधिक पिवळसर/केशरी दिसेल.
आता आपण वातावरणाचा परिणाम बाजूला ठेवला, तर चंद्राचा रंग आपल्याला दिसतो तो म्हणजे पांढरा/राखाडी आणि त्यावर काळे डाग!

पण समजा मी जर तुम्हाला म्हणालो की चंद्र केवळ पांढरा/काळा नसून त्याचा पृष्ठभाग निळा, केशरी, पिवळा, हिरवा, पांढरा, काळा अश्या अनेक रंगांचा बनला आहे? 
विश्वास बसत नसेल तर जोडलेला फोटो बघा. हा फोटो अगदी १००% खरा फोटो आहे. त्यावर असलेले रंग मी स्वत: भरलेल नाहीत. :)

चंद्रावरील हे रंग कुठून आले? ह्या रंगांचा अर्थ काय?

चंद्राचा पृष्ठभाग हा सपाट नाही. त्यावर डोंगर-दऱ्या, लावारसाची थंड झालेली मैदाने, उंच-सखल प्रदेश अश्या अनेक भौगोलिक गोष्टी आहेत.
मरिया, म्हणजेच चंद्रावरील काळे, गडद भाग. हे प्राचीन ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या परिणामी तयार झाले आहेत. लॅटिन भाषेत मरिया ह्याचा अर्थ समुद्र!
ह्या प्रदेशांना समुद्र म्हणण्याचे कारण म्हणजे प्राचीन खगोलशास्त्रज्ञांनी या भागांना वास्तविक समुद्रच समजले होते!
जे पांढरे सपाट भाग आहेत, किंवा जे डोंगराळ प्रदेश आहेत, त्यात उल्कापातामुळे तयार झालेली भरपूर विवरे आहेत.
काही अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा चंद्रावर भूगर्भिय हालचाली सुरू होत्या, तेव्हा चंद्राच्या अंतर्भागातून मोठ्या प्रमाणात लावारस बाहेर पडत होता. त्यासोबत अनेक संयुगे, खनिजेसुद्धा बाहेर पडत होती. 
त्यामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर संयुगांच्या स्वरूपात विविध धातू आणि खनिजांचे मोठे साठे आहेत.
त्यातील काही संयुगे म्हणजे iron oxide, titanium dioxide, magnesium oxide, aluminium oxide, silicon dioxide, sodium oxide, calcium oxide इत्यादी.

कोणत्या मूलद्रव्य/संयुगामुळे कोणता रंग दिसतो?

निळा - टायटॅनियम, ऑक्सिजन
केशरी/लाल - Ilmenite (लोखंड, टायटॅनियम, ऑक्सिजन)
हिरवा - Olivine (मॅग्नीशियम , सिलिकॉन , ऑक्सिजन)
काळपट गुलाबी - Pyroxene (मॅग्नीशियम , सिलिकॉन , ऑक्सिजन)

अधिक माहिती : https://en.wikipedia.org/wiki/Lunar_resources

 

मग हा फोटो काढला कसा?

डोळ्यांनी बघता आपल्याला चंद्रावरील हे रंग सहज दिसत नाहीत. परंतु कॅमेऱ्याचा सेंसर मात्र हे रंग टिपू शकतो. हा फोटो टेलिस्कोप सोबत कॅमेरा जोडून काढला आहे.
त्यानंतर फोटोमधील saturation (रंगांचा ठळकपणा) थोडासा वाढविला आहे.
(हे म्हणजे फोटोमध्ये बाहेरून रंग भरणे नाही. रंग फोटोमध्ये आहेतच, फक्त योग्य सेटिंग वापरुन ते समोर आणायचे. जसे आपण अंधारात काढलेले गडद फोटो थोडे लाइट करतो.)
आम्ही काढलेले असे अनेक फोटो इथे बघायला मिळतील - https://www.instagram.com/amateur_astronomers_group/

आता पुढील वेळेस तुम्ही जेव्हा चंद्राकडे बघाल, तेव्हा त्याला नक्की सांगा - "मला तुझे सर्व रंग माहीत आहेत :)"

-भूषण करमरकर




Comments

No Comments posted yet...

Post a Comment

CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.