२. उड्डाण
मोहिमेत सहभागी होणाऱ्या सर्व अंतराळवीरांचे प्रशिक्षण एकदम धडाक्यात सुरू झाले. नचिकेत 'जंपिंग चेअर' वर बसला होता. जम्पिंग चेअर म्हणजे एक खुर्ची उंच, दंडगोलाकार उभ्या खांबाला अडकवलेली असते. हायड्रॉलिक्सच्या साहाय्याने हा खांब एका झटक्यात खुर्चीला जमिनीपासून बराच वरती घेऊन जातो. क्षणार्धात खुर्चीचा वेग खूप कमी केला जातो. खुर्ची वरच्या दिशेने जाताना त्यावरील व्यक्तीस वजन वाढल्यासारखे वाटते आणि खाली येताना गुरुत्वाकर्षण नसल्याचा भास होतो. ह्या हालचालींमुळे शरीराला जोरात हादरा बसतो. अशा प्रकारचे हादरे अंतराळवीरांना यान पृथ्वीवरून उड्डाण करताना आणि मंगळावर उतरताना सहन करावे लागणार होते. त्यासाठीच हा सराव चालू होता. त्या अंतराळवीरांचे शरीर अशा धक्क्यांना सहन करू शकते का ते तपासण्यात येत होते.
मोहिमेमध्ये हरिहरन आणि के.रमेश हे दोघेही 'मिशन स्पेशलिस्ट' म्हणून काम पाहणार होते. सध्या दोघेही यानाच्या दुरुस्तीचे प्रशिक्षण घेत होते. शून्य गुरुत्वाकर्षणात स्पेस सूट घालून यानाच्या बाहेर जाणे, यानाच्या बिघडलेल्या भागाची पाहणी आणि दुरुस्ती करणे हे खूप जिकिरीचे काम होते. दोघांनाही स्पेस सूट घालून पाण्यात उतरवले होते. उच्च दाबाच्या साहाय्याने पाण्याची घनता वाढवून शून्य गुरुत्वाकर्षणाच्या वेळची स्थिती तयार करायचा प्रयत्न करण्यात आला होता. एकविसाव्या शतकातल्या विज्ञानाच्या साहाय्याने माणसाला पृथ्वीवर ही स्थिती निर्माण करणे शक्य झाले होते.
प्राची एयर इंडिया मध्ये गेले काही वर्ष वैमानिक म्हणून काम करत होती. तिचा अनुभव लक्षात घेऊनच 'मार्स वॉकर्स' यानाची ती मुख्य चालक म्हणून काम पाहणार होती. जसे ट्रेन चालवायला शिकवणारे किंवा विमान चालवायला शिकवणारे सिम्युलेटर असतात, त्याचप्रमाणे अंतराळयान चालवायला शिकवण्यासाठी असलेल्या खास सिम्युलेटरमध्ये बसून प्राची प्रशिक्षण घेत होती.
सर्वच जण आपल्याला असलेला अनुभव पणाला लावत होते. दिवस भराभर जात होते आणि त्याचबरोबर 'मार्स वॉकर्स' कडून सगळ्यांच्याच अपेक्षा सुद्धा प्रचंड उंचावत होत्या.
१० एप्रिल. अखेर उड्डाणाचा दिवस उजाडला. सर्व अंतराळयात्री स्पेस सूट घालून यानात आपापल्या जागेवर जाऊन बसले. यानाचे दरवाजे बंद झाले. यानापासून काही अंतरावर असलेल्या इमारतीमध्ये कंट्रोल रूम होती. तेथील तंत्रज्ञांनी अंतराळवीरांना काही सूचना केल्या. एका पाठोपाठ एक अश्या सर्व तपासण्या झाल्या.
फक्त भारत नव्हे तर समस्त जगाची नजर आता "मार्स वॉकर्स" कडे खिळली होती. ही मोहीम म्हणजे मानवजातीच्या वाटचालीतील एक अतिशय महत्त्वाचा टप्पा होता.
एस. पी. कॉलेजच्या मैदानात मोठा पडदा लावला होता. त्यावर उड्डाणाचे थेट प्रक्षेपण दिसणार होते. मैदान तुडुंब भरले होते. सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. कर्ण्यातून आवाज आला, "ऑल दि बेस्ट 'मार्स वॉकर्स'. द काउंट डाउन कंटिन्यूज ...
टेन, नाईन, एट,...... थ्री, टू, वन".... यानातून अग्नीच्या प्रचंड ज्वाळा पृथ्वीला खाली ढकलू लागल्या. यान अवकाशात झेपावू लागले. यानाच्या वेगामुळे सर्व अंतराळवीरांना क्षणभर आपले वजन वाढल्याचा भास झाला. आपल्याला दिलेल्या प्रशिक्षणाची त्यांना ह्यावेळेस आठवण झाली. यानाने काही मिनिटांतच बऱ्यापैकी अंतर गाठले. पुढील दोन दिवस यान पृथ्वीच्या कक्षेत राहून स्वात:ची गती वाढवेल आणि मगच मंगळाकडे कूच करेल.
उड्डाणाची प्रार्थमिक पायरी यशस्वी झाल्याची घोषणा इसरो मार्फत करण्यात आली. ते बघताच लोकांनी टाळ्या वाजवून एकच जल्लोष साजरा केला.
आज यानाने ताशी चौदा हजार पाचशे तीस किलोमीटर इतका वेग पकडला. योग्य वेळ साधून प्राचीने थ्रस्टर्स चालू केले. यान पृथ्वीच्या कक्षेतून हळू हळू बाजूला झाले आणि मंगळाच्या दिशेने त्याच्या मार्गावर स्थिरावले.
यानामध्ये सर्व जण उड्डाण होताना बसलेल्या धक्क्यांमधून सावरत होते. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव आता नसल्यातच जमा होता. खुर्चीचे पट्टे काढताच सर्व जण हवेत तरंगू लागले. सर्वांनी यानाच्या एका छोट्या खिडकीतून बाहेर पाहिले. पृथ्वी आणि चंद्र आता बऱ्यापैकी मागे पडलेले दिसले. निळ्याशार वसुंधरेला घिरट्या घालणाऱ्या चंद्राचे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडत होते. सर्वांनी त्या दृश्याचा मनमुराद आस्वाद घेतला आणि समस्त मोहिमेच्या भविष्याबद्दल विचार करण्यात सगळे दंग झाले. सर्वांना आता प्रतीक्षा होती ती एका नवीन शोधाची.
ज्यासाठी अजून पाच महिने प्रतीक्षा करावी लागणार होती.
क्रमश: