शनीची साडेसाती !

    काही दिवसांपूर्वी शनीची साडेसाती ह्या विषयावर एक पोस्ट वाचण्यात आली. फलज्योतिष विषयातही बरेच विज्ञान लपलेले आहे, आणि त्यामुळे त्या विषयाशी निगडित काही पोस्ट वाचण्याचे फायद्याचे ठरते. अर्थात त्यातील 'फल' हा विषय फारसा मनावर न घेता !

त्यात नमूद केले होते कि शनी एका राशीमध्ये अडीच वर्ष असतो. ज्या राशीमध्ये तो सध्या आहे ती रास तसेच त्याच्या पुढची आणि मागची मिळून ज्या तीन राशी होतात, त्यांच्यातून शनीचे भ्रमण होणे त्यालाच साडेसाती म्हणतात. (अडीच वर्षे एक रास, अश्या तीन राशी = साडेसात वर्षांची साडेसाती).

हे वाचल्यावर ह्यापूर्वी माहित असलेल्या काही गोष्टी डोक्यात आल्या.
१) सूर्य एक वर्षात बारा राशींमधून प्रवास करतो.
२) शुक्र, बुध हे ग्रह आपण बऱ्याचदा संध्याकाळी किंवा पहाटेच्या आकाशात बघतो. ते सुद्धा साधारण एका राशीमध्ये एकच महिना असतात.
३) मंगळ एका राशीमध्ये साधारण ४५ दिवस असतो.

वरील सर्व प्रकारात त्या ग्रहाची सूर्याभोवती फिरण्याची गती आणि पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची गती मोजूनच कालखंड मोजलेला आहे. सूर्य स्थिर आहे त्यामुळे त्याचा राशी प्रवास केवळ पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे आहे.

मग शनी एका राशीमध्ये अडीच वर्ष कसा काय असतो?

काही जणांशी चर्चा केल्यावर असं उत्तर पुढे आलं कि शनीचा सूर्याभोवती फिरण्याचा वेग अतिशय कमी आहे. त्यामुळे असं होतं.
तरीपण प्रश्न तसाच राहतो, कि पृथ्वी सहा महिन्यांनी सूर्याच्या विरुद्ध बाजूला असते, तेव्हा आपल्याला राशी, नक्षत्रे पूर्णपणे वेगळी दिसतात. मग शनी त्याच राशीमध्ये कसा राहतो?

 

अजून थोडा शोध घेतल्यावर समजलं कि गुरु एका राशीत अंदाजे एक वर्ष असतो.

मग माझी ट्यूब पेटली ! मी एक आकृती काढली. ती खाली दिलेली आहे.

शनी एका राशीत अडीच वर्ष असतो ह्याच कारण दोन प्रमुख घटकांवर आधारित आहे, जे मी आधी लक्षात घेतले नव्हते -
१) सूर्य - पृथ्वी अंतर (१ AU)
२) सूर्य - शनी अंतर (~ ९.५ AU)
म्हणजेच सूर्य - शनी अंतर हे सूर्य - पृथ्वी अंतरापेक्षा जवळपास दहापट अधिक आहे !

आता खालील आकृती बघा. ती अंतराच्या दृष्टीने 'टू द स्केल' काढली आहे.

 

शनीची साडेसाती

शनी सहा महिन्यात आकाशातील ६ अंश अंतर कापतो हे निरीक्षणाच्या आधारे गृहीत धरले आहे. (पिवळी रेषा)
सहा महिन्यात पृथ्वी सूर्याच्या विरुध्द्व दिशेला असेल. त्या दोन्ही जागांवरून शनिसोबत एक कोन तयार केला तर त्या कोनाचे माप ३० अंश पेक्षा बरेच कमी येत आहे. सूर्याशी तुलना केली तर हाच कोण १८० अंश आहे.
म्हणून शनी सूर्य किंवा इतर जवळील ग्रहांसारखा पटपट पुढे सरकत नाही.

एक रास ३० अंश ची पकडलेली आहे. (निळ्या रेषा)  - कारण एकूण १२ राशी आहेत. ३६०/१२ = ३०
म्हणजेच सहा महिन्यात ६ अंश, म्हणजेच एक वर्षात १२ अंश, आणि अडीच वर्षात ३० अंश !!
तर ३६० अंश पार करण्यास ३६० महिने म्हणजेच ३६०/१२ = ३० वर्ष !

शनी वक्री होतो म्हणजे काय?

पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे कधी कधी असा भास होतो कि शनी सध्या आहे त्या राशीमधून त्याच्या अलीकडील राशीमध्ये प्रवेश करत आहे.
असे समजा कि दोन सायकलस्वार आहेत. ते झाडांच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरून निघाले. एक सायकलस्वार उशिरा निघतो, पण त्याचा वेग दुसऱ्या सायकलस्वारापेक्षा अधिक आहे. जसजसा हा दुसरा सायकलस्वार पुढे पुढे जाईल, त्याला असे वाटेल कि पहिला स्वार हा आपल्या मागे मागे जात आहे. तसेच पाठीमागील झाडांशी तुलना केली तर जी झाडे पहिल्या स्वाराच्या पुढे होती, तीच त्याच्या आता मागे जात आहेत.
समजा सध्या शनी धनु राशीमध्ये आहे, तर कधी कधी पृथ्वीवरून आपल्याला असे दिसते कि शनी हा धनुच्या अलीकडील रास म्हणजेच वृश्चिक मध्ये प्रवेश करत आहे.
पृथ्वीची कक्षा गोलाकार असल्याने कालांतराने असे दिसेल कि शनी काही काळ वृश्चिक मध्ये थांबून पुन्हा धनु राशीमध्ये प्रवेश करत आहे. आणि कालांतराने तो धनुच्या पुढील रास म्हणजेच मकर मध्ये प्रवेश करेल.

ह्या कारणामुळेच साडेसाती मध्ये शनीचा तीनही राशींमधील प्रवास पकडलेला आहे. ह्यावरून आपल्या पूर्वजांनी शनी किंवा इतर ग्रहांचे किती बारीक आणि अचूक निरीक्षण केले होते ते समजते.

ही आकडेमोड करताना आणि सोपी पण रंजक गणितं मांडताना मजा आली. म्हणून ही माहिती लिहून काढली.

- भूषण करमरकर
www.puneastro.in




Comments

Girish Shahapurkar
फारच छान स्पष्टीकरण दिले आहे ! Thank you !
28-08-2023 12:26 pm
saurabh kulkarni
good
28-01-2023 10:45 am
Anonymous
Nice
01-06-2022 10:01 pm
Bharat Kalyani
Good Explanation in a Simplified way
01-06-2022 02:43 pm
Shubhangi Mane
Very informative.Thanks.Khoopch chhan mahiti.
01-06-2022 01:46 pm
saurabh
good
04-05-2022 07:14 pm
G. Ravindra.
Complicated subject made easy Hope it will help atleast some people to come out of "Shanicha fera."
02-06-2021 10:01 am
श्रद्धा गांगतिरकर
छान समजावून सांगितलं.
29-05-2021 04:59 pm
अरुण कुळकर्णी
फारच छान स्पष्टीकरण दिले आहे.
01-02-2021 05:14 am
Shailesh S
Khup chan samjawale aahe
30-10-2020 09:00 am
Meghana Jadhav
मस्तच. छान समजावल आहेस.
12-09-2020 10:39 am
Anagha
Bhushan,You have explained the concept very easily. Thank you
07-09-2020 10:57 pm
अंजली घायाळ
खूप अभ्यासपूर्ण विवेचन
07-09-2020 09:50 pm

Post a Comment

CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.