मंगळावरील छोटेसे उड्डाण, एक मोठी भरारी !

      अज्ञात गोष्टींविषयी जाणून घेण्याची इच्छाशक्ती आणि कुतूहल माणसाच्या प्रगतीसाठी शतकानुशतके फायदेशीर ठरत आलेले आहे. अंतराळातील अज्ञात गोष्टींचा शोध घेण्यासाठी आपण वेळोवेळी तंत्रज्ञानाच्या सीमा ओलांडीत आहोत. मंगळ ग्रहावर एक आगळावेगळा प्रयोग करून नासा (NASA) या अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेने इतिहास रचला. इनजेन्‍युटी (Ingenuity) नावाचे एक लहान हेलिकॉप्टर मंगळाच्या वातावरणात यशस्वीपणे उडविले गेले. ह्या अभूतपूर्व यशामुळे भविष्यात मंगळावरील संशोधनासाठी अनेक नवीन मार्ग खुले झाले आहेत.
 
मंगळावर प्राचीन काळात जीवन अस्तित्वात होते का ह्याचा शोध घेण्यासाठी नासा तर्फे 'मार्स २०२०' हि मोहीम सुरु आहे. मोहिमेमध्ये पर्सिव्हरन्स नावाची एक बग्गी आणि सोबत इनजेन्‍युटी हे एक छोटे हेलिकॉप्टर यांचा समावेश आहे. पर्सिव्हरन्सचे मुख्य काम मंगळावरील माती आणि खडकांचे नमुने गोळा करणे हे आहे. पुढील काही वर्षे हि बग्गी आपले काम करत राहील. भविष्यात मंगळाच्या मातीचे हे नमुने पृथ्वीवर परत आणण्याचे उद्दिष्ट शास्त्रज्ञांच्या डोळ्यासमोर आहे.
इनजेन्‍युटी ह्या हेलिकॉप्टरची  मंगळावरील विरळ वातावरणात चाचणी घेणे हासुद्धा प्रयोग ह्या मोहिमेचा भाग आहे. त्यातील पहिली उड्डाण चाचणी १९ एप्रिल रोजी यशस्वीपणे पार पडली.
 
४ डिसेंबर २०१२ रोजी नासा तर्फे ह्या मोहिमेची औपचारिक घोषणा करण्यात आली. जवळपास साडेसात वर्षांच्या तयारी नंतर ३० जुलै २०२० रोजी  ऍटलास V ह्या प्रक्षेपकामार्फत  'मार्स २०२०' चे पृथ्वीवरून प्रक्षेपण करण्यात आले. त्यानंतर सुमारे सात महिने अंतराळातील प्रवास करून, १८ फेब्रुवारी २०२१ रोजी पर्सिव्हरन्स आणि इनजेन्‍युटी मंगळाच्या पृष्ठभागावर अलगद खाली उतरले.
 
पर्सिव्हरन्स बग्गी
पर्सिव्हरन्स बग्गी

इनजेन्‍युटी हे हेलिकॉप्टर पर्सिव्हरन्सला खालच्या बाजूने जोडलेले होते.  ३ एप्रिल रोजी ते पर्सिव्हरन्स बग्गीपासून वेगळे झाले. इनजेन्‍युटीला खास पद्धतीने तयार केलेली कार्बन फायबरची चार पाती जोडण्यात आली आहेत. हि पाती एका मिनिटात २४०० वेळा स्वतःभोवती फिरू शकतात. पृथ्वीवरील हेलिकॉप्टरच्या पात्यांचा वेग लक्षात घेता इनजेन्‍युटीच्या पात्यांचा वेग प्रचंड आहे. इनजेन्‍युटी वरती अद्ययावत सौर पॅनल, बॅटरी, कॅमेरा आणि इतर काही उपकरणे आहेत. इनजेन्‍युटीचे एकूण वजन केवळ १.८ किलो ग्रॅम आहे.
 
Ingenuity (helicopter) - Wikipedia
इनजेन्‍युटी हेलिकॉप्टर - पर्सिव्हरन्सने काढलेला फोटो

एखाद्या हेलिकॉप्टरला मंगळावर उड्डाण करणे इतके अवघड का आहे?
ह्याचे मुख्य कारण म्हणजे मंगळावरील अतिशय विरळ वातावरण! मंगळावरील वातावरण पृथ्वीच्या वातावरणापेक्षा ९९% विरळ आहे. त्यामुळे इनजेन्‍युटीचे हलके असणे आणि त्याच्या पात्यांचा फिरण्याचा वेग इतका प्रचंड असणे महत्वाचे ठरते. त्यामुळेच त्याला पुरेशी 'लिफ्ट' मिळू शकेल.
इनजेन्‍युटी आणि पर्सिव्हरन्स दोघे मंगळाच्या 'जेझेरो' विवराच्या भागात कार्यरत आहेत. येथील तापमान रात्री उणे ९० अंश सेल्सिअस पर्यंत खाली जाते. इतक्या कमी तापमानात सर्व यंत्रणा अपेक्षेनुसार काम करणे हे एक मोठे आव्हान होते. इनजेन्‍युटी आणि पर्सिव्हरन्सची पृथ्वीवर चाचणी घेताना विशेष कक्ष बनविण्यात आले. तिथे मंगळासारखे वातावरण तयार आले. चाचण्यांच्या निष्कर्शांवरून दोन्ही मध्ये वेळोवेळी योग्य ते बदल करण्यात आले.
दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे पृथीवरील संदेश मंगळापर्यंत पोचण्यास काही कालावधी लागतो. त्यामुळे संदेशवहनात होणारा विलंब शास्त्रज्ञांनी गृहीत धरला होता. अश्या परिस्थिती मध्ये इनजेन्‍युटी मधील लहान संगणक स्वतःच योग्य तो निर्णय घेऊ शकेल असे डिझाईन केलेले आहे.
सोमवारी (१९ एप्रिल २०२१) इनजेन्‍युटीने मंगळावरील 'जेझेरो' विवराच्या परिसरात पहिले यशस्वी उड्डाण केले. ह्या छोट्या हेलिकॉप्टरने स्वतःला पृष्ठभागापासून ३ मीटर (8 .8 फूट) उंच नेले. सुमारे ३० सेकंदासाठी ते त्याच स्थितीत एका जागी स्थिर राहिले आणि मग हळू हळू जमिनीवर उतरले.
पुढील ३० दिवसांमध्ये इनजेन्‍युटी अजून चार ते पाच वेळा उड्डाण करेल. प्रत्येक उड्डाणाची जमिनीपासून उंची ३ ते ५ मीटर (१०-१६ फूट) असेल तर प्रतयेक उड्डाणाचा एकूण  कालावधी ९० सेकंदांपर्यंत असणार आहे.
सध्या इनजेन्‍यूटी हेलिकॉप्टर हे पर्सिव्हरन्स पासून काही अंतरावर असून, पर्सिव्हरन्स वरील कॅमेऱ्याने  त्याच्या उड्डाणाचा विडिओ टिपला आहे. इनजेन्‍यूटीच्या उड्डाणाचे थेट प्रक्षेपण नासाच्या जेट प्रोपल्‍शन लॅबोरेटरीच्या माध्यमातून करण्यात आले. नासानं प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये इनजेन्‍यूटी हेलीकॉप्‍टर काही सेकंदांसाठी मंगळ ग्रहावर उड्डाण घेत असल्याचं पाहायला मिळालं आहे.
हेलीकॉप्‍टरनं उड्डाण घेताच संपूर्ण लॅबमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. ह्या यशामुळे शास्त्रज्ञांमध्ये चांगलाच उत्साह निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.
 
इनजेन्‍युटीच्या पहिल्या उड्डाणाच्या यशाने हे दाखवून दिले की पृथ्वी व्यतिरिक्त दुसऱ्या ग्रहावर हेलिकॉप्टरचे नियंत्रित उड्डाण शक्य आहे.
१९०३ साली राईट बंधूंनी पृथ्वीवर जगातील पहिले विमान यशस्वीपणे उडवून दाखविले. त्याच 'राईट-फ्लायर' नावाच्या विमानाच्या पंखाचा एक छोटासा तुकडा इनजेन्‍युटीला जोडलेला आहे. मंगळाच्या ज्या भागामध्ये इनजेन्‍युटीचे उड्डाणाचे प्रयोग सुरु आहेत, त्या जागेस नासा तर्फे 'राईट ब्रदर्स फिल्ड' असे नाव देऊन राईट बंधूंचा गौरव करण्यात आला आहे.
 
इनजेन्‍युटीच्या ह्या यशामुळे शास्त्रज्ञांना अधिक अद्ययावत हेलिकॉप्टर्स आणि ड्रोन बनविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भविष्यकाळात ह्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मंगळाच्या पृष्ठभागाचे वेगळ्या नजरेतून आणि उंचावरून चित्रण करता येईल. मंगळावरील अवघड भौगोलिक प्रदेश जिथे आपले आजचे रोव्हर्स पोहचू शकत नाहीत, अश्या भागातही पोहोचणे शक्य होईल. भविष्यात मानवरहित हेलिकॉप्टर बनवून ते मंगळावर उडविण्यात आले तरी आश्चर्य वाटायला नको.
 
- भूषण करमरकर



Comments

निलेश पांडुरंग बोराटे
आपले इसरो चे हेलिकॉप्टर केव्हा उडणार आहे₹
26-04-2021 10:44 pm
VISHWAS KETKAR
किचकट प्रक्रिया सोप्या शब्दात वर्णन केले आहे, धन्यवाद!!
26-04-2021 07:17 am
Manas Lohar
Thank you astro-dnyanadeva :)
25-04-2021 06:21 pm
Varad Gangatirkar
Excellent article, well written.
25-04-2021 05:30 pm
Anita Bakhale
Very informative n well written!! भूषण,असाच 'लिहीता' रहा!!
25-04-2021 12:39 pm
R V Ghayal
Good & academic. Explained in simple language so that common man can understand the event.
25-04-2021 12:15 pm
Surendra
सोप्प्या शब्दात छान माहिती
25-04-2021 11:45 am

Post a Comment

CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.