आरंभ - भाग ५

५. पुन्हा मंगळ

  'मार्स वॉकर्स'चा प्रवास जवळपास संपत आला होता. काही तासांतच यान मंगळाच्या वातावरणात प्रवेश करणार होते. मंगळाच्या गुरुत्वाकर्षणाची जाणीव सर्वांना होऊ लागली. मंगळाचा आकार पृथ्वीपेक्षा लहान असल्याने त्याचे गुरुत्वाकर्षण हे ३. ७११ मीटर प्रती वर्ग सेकंद इतके, म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या जवळपास एक तृतीयांश आहे. इतके दिवस शून्य गुरुत्वाकर्षणात वावरल्याने गुरुत्वाकर्षणाची जाणीव होताच सर्वांना आपल्या हालचालींमध्ये बदल घडवून आणले. मंगळ जवळ येताच सर्व जण आपापल्या कामाला लागले.

इथून पुढे मंगळावर उतरताना प्रत्येक क्षणी पृथ्वीच्या संपर्कात राहणे 'मार्स वॉकर्स'ला गरजेचे होते.

परंतु एक अडचण येत होती. खूप वेळा प्रयत्न करूनही पृथ्वीशी संपर्क प्रस्थापित होत नव्हता. मंगळावर उतरताना प्रत्येक क्षण अतिशय मोलाचा होता. प्रत्येक हालचाल आणि कार्य हे ठरलेल्या वेळीच पूर्ण होणे महत्त्वाचे होते. एखाद्या सेकंदाच्या उशीरानेही सर्वांच्या जिवाला धोका निर्माण झाला असता.
जसजसा मंगळ जवळ येत होता, तशी सर्वांना जाणीव होऊ लागली कि पृथ्वीशी संपर्क करण्यात वेळ घालवणे सध्या तरी अयोग्य ठरेल. ह्या क्षणाला मंगळावर सुरक्षित उतरणे महत्वाचे होते. त्यामुळे आता मंगळावर उतरल्यावरच पृथ्वीशी संपर्क करावा असे ठरले.

यानाने मंगळाच्या वातावरणात प्रवेश केला. वातावरणाशी होणाऱ्या घर्षणामुळे यानाच्या बाहेरील भागाचे तापमान हे आठशे अंश सेंटिग्रेड पर्यंत गेले. इतकी उष्णता सहन करण्यासाठी यानाचे सर्वात बाहेरील आवरण विशिष्ट प्रकारच्या रासायनिक टाईल्सने तयार करण्यात आले होते.

मंगळाचा पृष्ठभाग जसा जवळ येऊ लागला, तसे यानाचे स्वयंचलित रेट्रो-रॉकेट्स चालू झाले. ज्याप्रकारे यान उड्डाण करताना रॉकेटच्या साहाय्याने वर ढकलले जाते त्याचप्रकारे यान खाली उतरताना रेट्रो-रॉकेट्स यानाच्या गतीच्या विरुद्ध दिशेने यानाला ढकलतात आणि यानाचा वेग कमी होतो. रेट्रो-रॉकेट्समुळे यानाचा वेग ताशी आठ हजार किलोमीटर वरून ताशी बाराशे किलोमीटर इतका कमी झाला. त्यानंतर एका पाठोपाठ एक अशा सात हवाई छत्र्या (पॅरशूट्स) उघडल्या गेल्या. त्यामुळे यानाचा वेग ताशी दोनशे किमीपर्यंत कमी झाला. यान पृष्ठभागापासून तीन हजार मीटर अंतरावर असताना यानातून प्रचंड मोठे असे पंधरा फुगे फुगून बाहेर आले. त्यांचा आकार एका त्रिमित त्रिकोणासारखा झाला. ह्या फुग्यांनी यानाला झाकून टाकले.

परत एकदा उलट मोजणी (काऊंटडाऊन) सुरू झाली... "फाईव्ह, फोर, थ्री, टू, वन"... आणि त्या क्षणाला यान वेगाने मंगळाच्या पृष्ठभागावर आपटले. एखाद्या चेंडूचे जमिनीवर अनेक टप्पे पडावे तसे यानाचे अनेक टप्पे पडत गेले. निर्धारित जागेपेक्षा यान सहाशे ऐंशी मीटर उत्तरेला जाऊन थांबले. काही मिनिटांनी सर्व फुग्यातील हवा एका यंत्राद्वारे काढून घेण्यात आली. फुग्यांनी हा जोराचा झटका शोषून घेण्याचे आपले काम पार पाडले. यानातील काही स्वयंचलित उपकरणे यान सुखरूप उतरल्याची खात्री करू लागली.

काही वेळाने यानाचा दरवाजा हळूहळू उघडला. त्यातून स्पेस सूट घातलेली पहिली व्यक्ती बाहेर पडली. नचिकेतने शिडीच्या पायरीवरून जमिनीवर पाय टेकवला आणि मानवाचे 'पहिले पाऊल' मंगळावर पडले. त्याने आपल्या कॅमेऱ्यात हा क्षण टिपून घेतला. १९६९ साली माणसाने चंद्रावर पाहिले पाऊल ठेवले होते. जेवढा आनंद नील आर्मस्ट्राँग यांना त्या काळी झाला असेल, त्याहून अधिकच आनंद आता नचिकेतला होत होता. तीन चार पावले चालून त्याने परिस्थितीचा साधारण अंदाज घेतला. त्यानंतर त्याने हरिहर, श्रेया आणि अमित, तसेच इतर सर्व साथीदारांना यानातून खाली येण्यास सांगितले.

मंगळ! ज्या ग्रहाला आतापर्यंत दुर्बिणीतून पाहत आलो, त्याच्या मातीत आज आपण उभे आहोत ह्यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. त्यांना हे सगळे एक स्वप्न वाटत होते. पुढची काही मिनिटे सर्वजण त्या क्षणाला मनात साठवून ठेवण्यात मग्न झाले.

काही वेळाने के. रमेश आणि अमितने पृथ्वीशी संपर्क साधायचा प्रयत्न चालू केला. मंगळावरील परिस्थितीचा आढावा तसेच तिथे करण्यात प्रयोगांची आकडेवारी 'मार्स वॉकर्स'च्या चमूने पृथ्वीकडे पाठवली की पृथ्वीवरील संगणक त्यावर काही प्रक्रिया करतील, आणि त्यांचे जे निकाल येतील ते परत 'मार्स वॉकर्स'ला पाठवण्यात येऊन त्यानुसार 'मार्स वॉकर्स'ने मंगळावर पुढील हालचाली कराव्यात असे ठरले होते. तेव्हा पृथ्वीशी संपर्क करता येणे महत्त्वाचे होते.

पृथ्वीशी संपर्क न होऊ शकण्याचे कारण शोधण्यासाठी एक मार्ग होता. अमितने यानामध्ये जाऊन टेलिव्हिजन आणि सेट टॉप बॉक्स चालू केला. त्यावरती १ जुलै २०३१ अशी तारीख घातली. सर्वजण अतिशय उत्सुकतेने टीव्हीवरील बातम्या बघू लागले. बातमी महत्वाची न भासल्यास ती भरभर पुढे पळवण्यात आली. ३० जुलैच्या बातम्यांमध्ये एक बातमी सर्वांना हादरवून टाकणारी होती. आयबीएन लोकमत वरती एक प्रतिनिधी माहिती देत होता. पृथ्वीवरील सर्व बिनतारी यंत्रणा हळूहळू बंद होत आहेत असे तो सांगत होता. यामध्ये स्वित्झर्लंड, जर्मनी तसेच युरोपातील काही देशांमध्ये मोबाईल सुविधा चालत नसल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. काही काळातच ही समस्या आशिया, आफ्रिका, अमेरिका खंडांमध्ये सुद्धा भेडसावू लागली होती. फक्त मोबाईलच नव्हे तर बऱ्याच उपग्रहांमधील बिनतारी संदेश यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याच्या नोंदी आढळल्या होत्या. पृथ्वीवरील सर्व प्रकारच्या बिनतारी यंत्रणा निकामी होण्याच्या बातम्या टीव्हीवरती चालू होत्या. सगळे चालू असतानाच टीव्ही वरील प्रक्षेपणात व्यत्यय येऊ लागले आणि त्यानंतर चित्र दिसणे बंद झाले. त्यापुढील तारखेचे रेकॉर्डिंग सेट टॉप बॉक्स मध्ये साठवले गेले नव्हते. हे सगळे नाट्य बघून सर्वच काळजीत पडले.

मंगळ आणि पृथ्वी यांमधील संदेशवहन संपूर्णत: पृथ्वीभोवती फिरणाऱ्या काही कृत्रिम उपग्रहांवरती अवलंबून होते. जर उपग्रह योग्यपणे कार्यरत नसतील तर इथून पुढे पृथ्वीशी संपर्क होणे केवळ अशक्य आहे हे सर्वांना कळून चुकले. पृथ्वीशी संपर्क करण्याच्या ह्या अथक प्रयत्नांमध्ये फार मोलाचा बराच वेळ निघून गेला आहे ह्याची कल्पना सर्वांना आली. मंगळावरील मोहीम यशस्वी करणे महत्वाचे होते. त्यानुसार सर्व प्रयोग हे एकमेकांच्या मार्गदर्शनाने आपले आपणच करायचे असे निश्चित झाले.

तेरा दिवसांच्या ह्या काळामध्ये प्रत्येकाला असंख्य जबाबदाऱ्या पार पाडायच्या होत्या. ठरल्यानुसार काही वेळातच के. रमेश एक उपकरण यानातून बाहेर घेऊन आला. मंगळाच्या वातावरणाचा दाब तपासण्याचे काम हे उपकरण करणार होते. त्या यंत्रातून एक काचेची निर्वात नळी त्याने बाहेर काढली. मंगळाच्या हवेचा नमुना घेऊन त्याने ती नळी परत यंत्रात घातली. लगेच त्या उपकरणाला असलेल्या पडद्यावर आकडेवारी येऊ लागली.

यंत्राने दिलेल्या आकडेवारीनुसार मंगळाच्या वातावरणाचा दाब हा ०.८ वातावरणी दाब (atmospheric pressure) इतका आला. ह्याचाच अर्थ पृथ्वीचा वातावरणी दाब आणि मंगळाचा वातावरणी दाब ह्या दोघांमध्ये फारच थोडा फरक होता. मानवी शरीर इतका कमी वातावरणी दाब सहन करू शकते !

मंगळावरील हवेत प्राणवायूचे प्रमाण १५ टक्के निघाले. मंगळाच्या वातावरणात ७५ टक्के कार्बन डायऑक्साइड आणि १० टक्के नायट्रोजन असल्याचे दिसून आले. पृथ्वीच्या हवेमधील प्राणवायूचे प्रमाण हे २१ टक्के व वातावरणात सर्वात मोठा वाटा नायट्रोजनचा आहे. कार्बन डाय-ऑक्साइडचे प्रमाण अतिशय नगण्य आहे. मंगळावरील वातावरणाच्या ह्या पूर्वी मानवाला माहीत असलेल्या आकडेवारीमध्ये आणि आता उपकरणाने दिलेल्या ताज्या आकडेवारीमध्ये काही प्रमाणात फरक दिसत होता. खास करून ऑक्सिजनचे प्रमाण थोडे वाढल्याचा निष्कर्ष दिसत होता.

यानातील संगणकावर ही माहिती भरण्यात आली. माणसाच्या शरीरावर अशा वातावरणाचा काय परिणाम होईल हे शोधण्याचे काम संगणकातील एक विशिष्ट प्रणाली करत होती. संगणकाच्या पडद्यावर निकाल दिसू लागले. वातावरणातील 'कमी' दाबामुळे माणसाच्या हृदय आणि फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होईल. कार्बन डाय-ऑक्साइडच्या अतिरिक्त प्रमाणामुळे आणि ऑक्सिजनच्या कमी मात्रेमुळे खूप मोठा श्वास घेणे गरजेचे असेल. तरीही त्यातून मिळालेला ऑक्सिजन शरीराला पुरेसा ठरेलच असे ठोसपणे सांगता येत नव्हते. ह्या सगळ्यामुळे हृदयरोग, रक्तदाब, त्वचेचे विकार होण्याची शक्यता पन्नास टक्क्यांनी बळावेल असे संगणकाने दाखवले.
कार्बन डाय-ऑक्साइडच्या मोठ्या प्रमाणामुळे दिवसाचे तापमान पृथ्वीवरील दिवसाच्या तापामानापेक्षा सात ते आठ अंश सेल्सिअसने जास्त होते. ह्या तापमानाचा परिणाम मानवी शरीरावर होऊन त्याच्या स्वेदग्रंथींवर ताण येईल. पर्यायाने शरीराला पाण्याची अधिक गरज भासेल असे भाकीत संगणकाने दाखविले. म्हणजे, मानवाची आयुर्मर्यादा कमी होणार हे निश्चित दिसत होते.

निकाल पाहून सर्वजण चाट पडले. माणूस अशा परिस्थितीमध्ये जिवंत राहू शकतो ह्यावर इतक्या सहजासहजी विश्वास ठेवण्याचे कोणाचेही धाडस होत नव्हते.

काही वेळात सर्वजण आपापल्या कामाची तयारी करण्यात मग्न झाले. यानाचाच भाग असलेली एक बग्गी एका वेळी चार लोकांना मंगळाच्या लांबवर पसरलेल्या मैदानांवर फिरता यावे या उद्देशाने तयार करण्यात आली होती. मंगळाच्या उत्तरेकडे असणाऱ्या त्या 'हिरव्या' भागाचे कारण शोधण्यासाठी बग्गीला त्या जागेवर नेणे अनिवार्य होते. त्यानुसार चौघांना घेऊन बग्गीचा मोर्चा उत्तरेकडे वळला.

मंगळाच्या भोवती फिरणाऱ्या 'इन-सेट मार्स २' ह्या भारताच्या उपग्रहाद्वारे बग्गीचे ठिकाण एका छोट्या संगणकाच्या स्क्रीनवर दिसत होते. हे अगदी पृथ्वीवरील 'जीपीएस'सारखेच होते. मंगळाभोवती फिरणारा हा उपग्रह अगदी योग्यपणे त्याचे काम पार पाडत आहे हे बघून त्यांना आश्चर्य वाटले. बग्गीचा संथ वेग, मंगळावरील खडकाळ जमीन ह्या सर्व कारणांमुळे हा प्रवास एकूण दोन दिवस आणि एक पूर्ण रात्र असा असणार होता. मोहिमेच्या काळादरम्यान पृथ्वी मंगळाच्या आकाशात रात्री दिसत नव्हती.

एका दीर्घ प्रवासानंतर बग्गी त्या हिरव्या प्रदेशाच्या अगदी जवळ येऊन पोहोचली. बग्गीतून चौघे खाली उतरले. मंगळावरील 'त्या' हिरव्या भागावर ते उभे होते आणि हिरव्या रंगाचे कारण काय असावे त्याचे एकमेव उत्तर त्यांना मंगळपृष्ठावर दिसत होते. मंगळपृष्ठावर पृथ्वीवरील शेवाळ्याशी मिळताजुळता एक पदार्थ पसरला होता. त्या पदार्थाचे नमुने गोळा करण्यात आले. त्याचे काही गुणधर्म तपासण्यात आले. तेथील गवतसदृश दिसणाऱ्या वनस्पतीची पाने एका यंत्रात ठेवण्यात आली. यंत्राने दिलेल्या माहितीनुसार त्यामध्ये सेल्युलोज आणि क्लोरोफिल आढळून आले. ज्या भागात हा हिरवा पदार्थ होता, त्या भागातील मातीत पाण्याचा अंश आढळला. ह्या सर्व गोष्टींवरून तो हिरवा पदार्थ म्हणजे काही वेगळे नसून एक प्रकारची वनस्पतीच आहे हे निश्चित झाले.

बातमी अतिशय सुखद धक्का देणारी होती. मंगळावर जीवसृष्टी आहे का हा आता प्रश्न राहिला नव्हता, तर ते एक सत्य होते. ह्यापुढे आपल्याला आणखी काय काय पाहायला मिळेल ह्याचा अंदाज लावणे आता सर्वांनाच सोपे वाटू लागले.

बग्गी हळूहळू पुढे नेण्यात येत होती. शेवाळ्याचा रंग गडद होत चालला होता. गवताची छोटी छोटी पाने मातीतून वर डोकावताना दिसत होती. काही वेळाने बग्गी परत एकदा थांबली. ह्या भागात गवताबरोबरच लहान झुडुपेही दिसत होती. त्या भागातील माती खूपच ओलसर होती. त्यात पाण्याचे अस्तित्व अगदी स्पष्ट जाणवत होते. बग्गीच्या एका 'रोबोटिक आर्म'ने माती काही प्रमाणात खणून पृथ्वीवरून आणलेले कडूनिंबाचे रोपटे ह्या भागात लावले. ह्या भागातील माती, त्यामध्ये असलेले पाणी, इथे असणारी हवा, गवताची पाती आणि शेवाळे ह्या सर्वांचे नमुने गोळा करण्यात आले. सर्व नमुने घेऊन बग्गीने यानाचा मार्ग धरला.

माघारी येतानाच्या प्रवासात शक्य तेवढ्या भागात पृथ्वीवरून आणलेली विविध फळे आणि भाज्यांची बियाणी रचनात्मक आकारात पेरण्यात आली.

क्रमश:

भाग ६ (अंतिम) - https://puneastro.in/blog-and-news/article/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%AD-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%AC-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE




Comments

No Comments posted yet...

Post a Comment

CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.