४. प्रयोग
घनश्याम आणि सुधीर धावत पळतच लोहगावाला पोचले. त्यांना दुपारी तीनचे स्वित्झर्लंडचे विमान पकडायचे होते.
घनश्याम हा पुणे विद्यापीठात पदार्थविज्ञान विभागात संशोधक होता. अणू-रेणूंबद्दल त्याने आतापर्यंत खूप आश्चर्यजनक माहिती जगासमोर आणली होती. विशेषत: प्रचंड गुरुत्वाकर्षणाच्या दबावाखाली अणू-रेणूंमध्ये होणारे बदल हा त्याच्या संशोधनाचा विषय होता.
सुधीर हा पुणे विद्यापीठात आण्विक भौतिकशास्त्र विषयामध्ये पीएचडी करत होता. घनश्यामच्या मार्गदर्शनाखाली त्याने कामामध्ये कमालीची चुणूक दाखवली होती. विशिष्ट प्रकारच्या मूलकणांचा मारा अणूच्या गाभ्यावर केला की गाभ्यामध्ये जे बदल घडतात त्यातून एका नवीनच पदार्थाची निर्मिती होते. अशा नवनिर्मित पदार्थाचे गुणधर्म शोधून त्यांचे वर्गीकरण करणे हेच सुधीरचे काम होते. दोघांचेही शोधनिबंध 'नेचर'च्या अंकांमधून जगासमोर पोहोचले होते.
पुढच्या सहा महिन्यांसाठी दोघांना 'लार्ज हॅड्रॉन कोलायडर' संबंधित एका प्रयोगासाठी बोलावण्यात आले होते. 'लार्ज हॅड्रॉन कोलायडर' किंवा 'एल एच सी' म्हणजे युरोपातील काही राष्ट्रांनी एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला हाती घेतलेला प्रकल्प. विविध जड मूलद्रव्यांच्या गाभ्यांवर 'क्वार्क्स' आणि 'प्रोटॉन्स' ह्या मूलकणांचा भडिमार केल्याने जो नवीन पदार्थ तयार होईल त्याचा अभ्यास करणे हेच ह्या प्रकल्पाचे मुख्य स्वरूप होते. येत्या काळात 'एल एच सी'वर एक आगळावेगळा प्रयोग होणार होता.
विसाव्या शतकात पीटर हिग्स ह्या अणू शास्त्रज्ञाने 'बोसॉन' ह्या अणू कणाची कल्पना मांडली.
पीटर हिग्स ह्यांचे विचार असे होते :
"मानवाला माहीत असणाऱ्या अणू-रेणूंच्या प्रमाणित रचनेमध्ये बोसॉन ह्या काल्पनिक कणांचे अस्तित्व गृहीत धरले आहे. ह्या काल्पनिक कणांना वगळल्यास किंवा त्यांचे अस्तित्व गृहीत न धरल्यास अणूंची प्रमाणित रचना पूर्णच होत नाही. त्यामुळे ह्या प्रमाणावर आधारित असणारे सर्व नियम मोडकळीस येतात.
मानवाला आतापर्यंत माहीत असलेले सर्वात सूक्ष्म कण – क्वार्क्स ह्यांच्याहून बोसॉन कण आकाराने लहान असतात. ह्या कणांमध्ये प्रचंड ऊर्जा असल्याने ते खूप अस्थिर असतात आणि त्यांचा अस्तित्वात असण्याचा कालखंड हा अतिशय कमी म्हणजेच सेकंदाच्या दहा लाखाव्या भागाएवढा असतो. विश्वाच्या उत्पत्तीच्या वेळेस, सुरुवातीच्या काही सेकंदांमध्ये बोसॉन कणांचा मोठा वाटा असावा"
या आधी करण्यात आलेल्या प्रयोगांमध्ये बोसॉन कणांचे अस्तित्व सिद्ध झाले होतेच. परंतु ज्या सिद्धांतांवर सध्या सगळे जग चालते ते म्हणजे, न्यूटनचे गुरुत्वाकर्षणाचे नियम, आइनस्टाइन यांचा सापेक्षतावाद आणि प्लॅंक यांचा पुंजवाद (क्वांटम) सिद्धांत. परंतु ह्या तीनही सिद्धांतांना आपापल्या काही मर्यादा आहेत.
अंतराळात असणाऱ्या काही गोष्टी, उदाहरणार्थ कृष्णविवर किंवा क्वेसार यांच्या बाबतीत हे सिद्धांत कोलमडून पडतात. आकाशगंगेच्या मध्यभागी असलेल्या ताऱ्यांची हालचाल ह्या नियमांनुसार न होता वेगळ्या पद्धतीने होते असे संशोधकांना आढळून आले आहे.
पदार्थाच्या कोणत्याही अवस्थेला लागू पडेल अशा महासिद्धांताचा ध्यास जगातील शास्त्रज्ञांना लागलेला होता.
'थेरी ऑफ एव्हरीथिंग' !
'एल एच सी' वर करण्यात येणाऱ्या प्रयोगांमध्ये शास्त्रज्ञांचे मूळ उद्दिष्ट बोसॉन कणांची परत एकदा यशस्वी निर्मिती करणे आणि त्यांचे अस्तित्व जास्तीत जास्त काळ टिकवणे हेच होते. ह्या आगळ्यावेगळ्या प्रयोगांतून काही नवीन माहिती मानवाच्या हाती लागू शकेल. कदाचित प्रयोगांच्या उत्तरांमध्येच एक वैश्विक सिद्धांत दडलेला असेल जो विश्वात चालणाऱ्या सर्व घडामोडी भौतिकशास्त्राच्या नियमांमध्ये कैद करू शकेल !
आजपर्यंत 'एल एच सी'मध्ये अनेक प्रयोग करून झाले होते. ह्या आधी प्रोटॉन्सचा एक तीव्र झोत हा ३. ५ टी. ई. व्ही. (टेरा इलेक्ट्रॉन वोल्ट) इतक्या प्रचंड ऊर्जेनिशी युरेनियमच्या गाभ्यावर धडकवण्यात शास्त्रज्ञ यशस्वी झाले होते. नवीन प्रयोगात प्रोटॉन्सचा झोत ६. ५ टी. ई. व्ही. इतक्या प्रचंड ऊर्जेने युरेनियम अणूच्या गाभ्यावर धडकवण्यात येणार होता. ही ऊर्जा आधीच्या प्रयोगात वापरल्या गेलेल्या ऊर्जेच्या जवळपास दुप्पट होती. इतकी प्रचंड ऊर्जा पदार्थाच्या अणूच्या आकाराइतक्या कमी जागेत केंद्रित करणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे हे एक फार मोठे आव्हान असणार होते. संगणकाच्या साहाय्याने प्रोटॉनांच्या झोताची तीव्रता आणि त्याची ऊर्जा किती असावी हा आकडा काढण्यात आला होता. संपूर्ण प्रयोगाचे नेतृत्व डच शास्त्रज्ञ टॉम वॉलबर्ग ह्यांच्याकडे होते. प्रोटॉनांच्या झोतावर आणि त्याच्या ऊर्जेवर संगणकाच्या साहाय्याने नियंत्रण ठेवण्याचे काम घनश्यामचा गट करणार होता. तर प्रयोगातून उत्पन्न होणाऱ्या नवीन मूलद्रव्यांचे विश्लेषण करणाऱ्या गटामध्ये सुधीर होता.
आज १५ जुलै, २०३१, प्रयोगाचा दिवस. प्रयोगाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. काही मिनिटांतच प्रयोगाला सुरुवात होणार होती. एकदा प्रयोग सुरू झाला की तो थांबवता येणे अशक्य होते. त्यामुळेच शेवटच्या सेकंदापर्यंत सगळे शास्त्रज्ञ प्रत्येक गोष्ट 'पुन्हा एकदा' तपासत होते.
प्रयोग सुरू करण्यात आला.
प्रयोग चालू होऊन १३ मिनिटे आणि २६ सेकंद लोटली. संगणकाने प्रयोग यशस्वीरीत्या सुरू झाल्याची खात्री दिली. ते पाहताच सगळीकडे एकच जल्लोष झाला. सगळीकडे आनंदी वातावरण निर्माण झाले. अणूंमधील कणांच्या ह्या धडकेचे कल्पनाचित्र संगणकाच्या पडद्यावर दिसत होते. येत्या महिन्याभराच्या काळात प्रयोगाचे निकाल स्पष्ट होऊन ह्या अफाट विश्वाबद्दल एक वैश्विक सिद्धांत समोर येईल असा सर्वांना विश्वास होता.
क्रमश: