आरंभ - भाग ३

3. क्वार्क ग्लूऑन प्लाझ्मा

     जेव्हापासून केनेडींना संशोधनासाठी 'तो' विशिष्ट पदार्थ देण्यात आला होता, तेव्हापासून प्रोफेसर केनेडी आपल्या प्रयोगशाळेतच मुक्कामास होते. काही महिन्यांपूर्वीच यशस्वी झालेल्या प्रयोगांतून शास्त्रज्ञांना माहीत नसलेल्या एका नव्या पदार्थाची उत्पत्ती झाली होती. शास्त्रज्ञांनी त्याला  'क्वार्क ग्लूऑन सॉलिड' असे नाव दिले. ह्या पदार्थाचे वैशिष्ट्य असे, की पृथ्वीवरील हा आतापर्यंतचा सर्वात घन आणि जड पदार्थ होता. त्याच्या एक चमचा मात्रेचे प्रमाण पृथ्वीवर सत्तर किलोग्रॅम भरेल इतका जड.
'क्वार्क ग्लूऑन सॉलिड' चे विश्लेषण करण्याचे काम प्रोफेसर जीन केनेडी यांच्याकडे सोपवण्यात आले होते. केनेडी हे 'युरोपियन स्पेस ऑर्गनायझेशन - इ एस ओ' मध्ये एक ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित शास्त्रज्ञ म्हणून नावाजलेले होते.

बऱ्याच परिश्रमांनंतर आता ते संगणकाच्या पडद्यावर एका निकालाची वाट पाहत होते. संगणकावर जे चित्र केनेडी बघत होते, त्याच्याबरोबरच त्यांच्या हृदयाचे ठोके वाढत चालले होते.
असे काही विज्ञान, जे माणसाला आतापर्यंत माहीत नव्हते, ते सत्य, केनेडी संगणकाच्या पडद्यावर वर बघत होते. संगणकावरील आकडेवारी आणि निष्कर्ष पाहून त्यांनी लगेचच काही समीकरणे मांडायला सुरुवात केली. कोणत्याही परिस्थितीत त्यांना आजच्या आज ती समीकरणे संगणकावर चढवणे भाग होते. त्या समीकरणांचे निकाल संपूर्ण मानवजातीसाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार होते.

ज्या प्रयोगातून 'क्वार्क ग्लूऑन सॉलिड' हा विशिष्ट पदार्थ निर्माण झाला होता, तसाच आणखी एक प्रयोग काही दिवसांतच पुन्हा एकदा करण्यात येणार असल्याचे नक्की झाले होते. संगणक ह्या समीकरणांचे जे निष्कर्ष देईल, त्या निष्कर्षांवर ह्या प्रयोगाचे भवितव्य अवलंबून होते.
काही वेळातच केनेडी यांनी संगणकाला काही समीकरणे सोडवायला दिली. संगणक ती गणिते सोडवण्यात दंग झाला. पुढील काही तास संगणकाकडून येणाऱ्या उत्तरांची वाट बघण्यात गेले.
सकाळी ७ वाजता संगणकातून येणाऱ्या बीप मुळे केनेडींना जाग आली. संगणकाने समीकरणे सोडवून उत्तरे मांडली होती. केनेडी यांनी सगळी आकडेवारी आणि निष्कर्ष तपासले.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे संगणकाने दिलेले निष्कर्ष केनेडी यांच्या अपेक्षेहून वेगळे होते.

संगणकाचे निष्कर्ष अतिशय स्वाभाविक होते. केनेडी यांचा अनेक वर्षांचा अनुभव आणि गेले काही दिवस ह्या विशिष्ट पदार्थावर त्यांचे असलेले काम लक्षात घेता त्यांना संगणकाची आकडेवारी मान्य नव्हती.
ह्याचा पडताळा घेण्यासाठी एक सोपा पण वेळखाऊ मार्ग होता. संगणकाला दिलेली समीकरणे स्वत: सोडवून बघायची. जे काम संगणक काही तासात पूर्ण करतो तेच काम माणसाने करायला कमीत कमी २ दिवसांची आवश्यकता होती. केनेडी यांनी आपल्या सहकाऱ्यांची एक टीम तयार केली. सर्व गणितांची रीतसर मांडणी आणि कामाची वाटणी केली. गरज पडेल तिथे संगणकाचा वापर केला गेला. दीड दिवसात उत्तरे हाती आली.

निष्कर्ष बघून केनेडी एकदम आश्चर्यचकित आणि भयभीत होऊन जागेवरून उठले. हाती असलेल्या निकालांचा विचार करता इथून पुढचा काळ मानवासाठी अतिशय भयानक होता. आणखी एकदा पडताळा म्हणून त्यांनी परत संगणकामध्ये संपूर्ण प्रोग्राम लोड केला. परत एकदा संगणकाने आधीचीच उत्तरे दाखवली. संगणक प्रणालीमध्ये काहीतरी त्रुटी आहे अशी शंका त्यांच्या मनात निर्माण झाली. संगणक प्रणालीमध्ये असलेला दोष शोधून काढण्यापेक्षा आपल्या समीकरणांची उत्तरे इतर शास्त्रज्ञांना तातडीने कळवणे केनेडी यांना गरजेचे वाटले. त्यांनी गाडी काढली आणि 'इ एस ओ' च्या कार्यालयाकडे वळवली.

त्यांच्या संशोधनातून त्यांनी जे निष्कर्ष काढले ते त्यांनी इतर वैज्ञानिकांसमोर मांडले. काही दिवसांनी होणार असणाऱ्या नव्या प्रयोगातून 'क्वार्क ग्लूऑन प्लाझ्मा' हा अफाट घनतेचा जड पदार्थ निर्माण होईल असा ठोस दावा केनेडी यांनी केला.
नासामधील काही शास्त्रज्ञांच्या मते 'क्वार्क ग्लूऑन प्लाझ्मा' हा पदार्थ दीर्घिकांच्या मध्यभागी असणाऱ्या कृष्णविवरांमध्ये आढळून येतो! थोडक्यात म्हटले तर पृथ्वीवर ह्या प्रयोगामुळे एक छोटेसे कृष्णविवरच तयार होईल असा सावधानतेचा इशारा प्रोफेसर केनेडी देत होते.

शास्त्रज्ञांची अजून एक टीम तयार करून त्यांना स्वतंत्रपणे समीकरणे सोडवण्यासाठी देण्यात आली.

केनेडी यांनी दिलेला निष्कर्ष बघून, सर्व माहिती परत एकदा संगणकामध्ये भरण्यात आली. संगणकाच्या सॉफ्टवेअर अभियंत्यांशी संपर्क केला गेला. त्यांच्याकडून त्या प्रणालीबद्दल सविस्तर माहिती मिळवली गेली. ह्या वेळेस संगणकाच्या उत्तरांकडे सर्वच शास्त्रज्ञ नजर ठेवून होते. काही वेळातच संगणकाने उत्तरे मांडायला सुरुवात केली.

संगणकाने दिलेले निष्कर्ष आणि केनेडी यांची आकडेवारी ह्याच्यात प्रचंड तफावत स्पष्ट होत होती.
उपस्थित असलेल्या संगणक अभियंत्यांनी हा प्रश्न व्यवस्थित समजून घेतला. त्यांना देण्यात आलेल्या माहितीनुसारच प्रणाली विकसित केलेली होती. वेळेवेळी संगणक अभियंत्यांनी शास्त्रज्ञांना मदतीस घेतले होते.
कोणत्याही तांत्रिक पुराव्याखेरीज संगणक प्रणाली सदोष आहे असे म्हणणे सुद्धा योग्य नव्हते. ज्या कंपनीची प्रणाली संगणकात टाकली होती त्या कंपनीला प्रणालीमध्ये दोष आहे का हे शोधण्यासाठी आणि असल्यास तो दोष काढण्यासाठी काही दिवसांची मुदत देण्यात आली. प्रणालीमध्ये कोणताही दोष न सापडल्यास संगणकाच्या आकडेवारीनुसार प्रयोग घडवून आणायचा असे ठरविण्यात आले.
त्याच काळात स्थापन केलेल्या स्वतंत्र टीमच्या निष्कर्षांकडेसुद्धा सर्वांचे लक्ष लागले होते.

काही दिवसांत होणाऱ्या प्रयोगाबाबत कमालीची गुप्तता पाळण्यामागे खरे कारण हेच होते.

क्रमश:

भाग ४ - https://puneastro.in/blog-and-news/article/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%AD-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%AA




Comments

No Comments posted yet...

Post a Comment

CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.