१. मंगळ
आज २ फेब्रुवारी २०३१. मंगळावर पाणी असल्याचा शोध लागून १४ महिने पूर्ण होत आहेत. श्रीहरीकोटा इथे 'मार्स वॉकर्स' ह्या मोहिमेची तयारी जोरात चालू आहे. मंगळावर पाण्याचे अस्तित्व आढळल्यावर भारताने तातडीने ही मोहीम हाती घेतली. ह्याच संदर्भात मोहिमेचे मुख्य शास्त्रज्ञ श्री. सतीश दिवेकर बातम्यांमध्ये सविस्तर माहिती सांगत होते.
"मोहिमेची १ जून ही तारीख निश्चित झाली आहे. ह्या मोहिमेमध्ये दहा जणांचा चमू मंगळावर पाठवण्यात येईल. मोहिमेसाठी दहा तरुणांची निवड केलेली आहे. ह्यामध्ये पाच पुरुष आणि पाच स्त्रिया असतील. मोहिमेमध्ये मंगळावरील हवेचा दाब तपासणे, तेथील गुरुत्वाकर्षण आणि पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण यांची तुलनात्मक चाचणी करणे, मंगळावर मेणबत्ती लावून त्यातून निघणाऱ्या ज्वाळेचे गुणधर्म तपासणे, असे एकूण १५ वेगवेगळे प्रयोग करण्यात येणार आहेत. मंगळाच्या उत्तर गोलार्धात एका विशिष्ट जागी लाल रंगावर हिरवा भाग दृष्टीस पडतो. ह्या हिरव्या भागाचा आकार लंबगोलाकार असून त्याचा विस्तार साधारण फुटबॉलची चार मैदाने बसतील इतका आहे. तो हिरवा रंग नक्की कशामुळे दिसत आहे त्याचा शोध घेण्याचे काम सुद्धा 'मार्स वॉकर्स' करतील.
ह्या सगळ्या गोष्टी पूर्णत्वास न्यायला सर्व अंतराळवीरांना मंगळावर १३ दिवस मुक्काम करावा लागणार आहे.
यान मंगळाच्या जवळ पोहोचेल, तेव्हा पृथ्वीपासून यानाने ५.६ कोटी किलोमीटर अंतर कापलेले असेल. यानाला कमीत कमी अंतर पार करायला लागावे ह्यासाठी मंगळ पृथ्वीच्या सर्वात जवळ असण्याचा कालखंड आणि यान मंगळाजवळ पोहोचण्याची वेळ, अगदी मापून काढण्यात आली आहे.
सरासरी ताशी पंधरा हजार किलोमीटर वेगाने यान मंगळाकडे झेपावेल. यानाचे इंजिन सौर ऊर्जा आणि आण्विक ऊर्जा अशा दोन्ही प्रकारच्या ऊर्जांवर चालेल असे बनविण्यात आले आहे. यानाच्या एका वेळच्या प्रवासाचा कालखंड एकूण पाच महिन्यांचा असणार आहे. यानामध्ये तेरा महिने पुरेल एवढा अन्नाचा साठा असेल. यानाच्या हालचालींवर आणि प्रयोगांच्या निकालांवर 'इस्रो' पृथ्वीवरून कायम लक्ष ठेवून असेल."
"मोहिमेमध्ये दहा अंतराळवीरांबरोबर कडुनिंबाचे एक छोटे रोपटेसुद्धा पाठवण्यात येणार आहे. त्याच्यावर विशेष रासायनिक प्रक्रिया करण्यात आलेली आहे, जेणेकरून कमी सूर्यप्रकाशात ते जिवंत राहू शकेल. त्याचबरोबर, मंगळाच्या पाणी असणाऱ्या भागातील मातीमध्ये पेरण्यासाठी काही निवडक वनस्पती पाठविल्या जातील, ज्यामध्ये कडुलिंब आणि वड, तसेच भाज्या, फळे यांची बियाणी सुद्धा असतील. मंगळावर सापडलेल्या पाण्यामुळे ह्या बियाण्यांना कोंब फुटतील अशी अपेक्षा आहे.
झाडांना लागणारा कार्बन डाय-ऑक्साइड मंगळावर मुबलक प्रमाणात उपलब्ध असला तरी मंगळावरील सूर्यप्रकाश हा पृथ्वीवरील सूर्यप्रकाशाच्या ३६% इतकाच आहे. ह्या कारणामुळे मंगळावर झाडांची वाढ पृथ्वीवरील झाडांच्या तुलनेत कमी वेगाने होणे अपेक्षित आहे. त्यांच्या रचनेमध्ये बदल होण्याचीही शक्यता आहे. मोठ्या प्रमाणावर झाडे लावणे हा मंगळावर असणाऱ्या कार्बन डाय-ऑक्साइडचे प्रमाण कमी करण्यासाठी एक जलद मार्ग आहे. मंगळाचा लाल रंग आपण हिरव्या रंगात बदलू शकू असा विश्वास आम्ही बाळगून आहोत."
"मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो की 'टाटा स्काय' आणि 'रिलायन्स ग्रूप' यांच्या सौजन्याने 'मार्स वॉकर्स' यानामध्ये एक सेट-टॉप-बॉक्स आणि टीव्ही बसवण्याची योजना आहे. यानातील एक खास उपकरण पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहाकडून संदेश ग्रहण करत राहील. बातम्यांच्या चार निवडक वाहिन्यांचे २४ तास रेकॉर्डिंग एका हार्ड डिस्क वर केले जाईल अशी सोय करण्यात आली आहे. यानांतील अंतराळवीरांना त्यांच्या प्रदीर्घ प्रवासात करमणूक व्हावी तसेच पृथ्वीवरील घडामोडींबद्दल त्यांना माहिती मिळत राहावी म्हणून ही सुविधा करण्यात आलेली आहे. सर्वांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि जनतेच्या शुभेच्छांमुळे मोहीम नक्कीच यशस्वी होईल ह्यात शंका नाही."
इतके बोलून दिवेकरांनी पत्रकारांचा निरोप घेतला.
मानवाला ध्यास लागला होता तो फार पूर्वीपासून सतावत आलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा. पृथ्वीव्यतिरिक्त इतरत्र कुठे जीवसृष्टी अस्तित्वात आहे का? वाढती लोकसंख्या बघता पृथ्वी आपल्याला पुरेशी असेल का? माणसाला मंगळावर एक नवीन वस्ती निर्माण करता येईल का? माणूस तिथे जगू आणि टिकू शकेल का? पण लवकरच ह्या सर्वांची उत्तरे माणसाला मिळणार होती.
क्रमश: